कोथरूड मध्ये सुरू होणार अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज २०० बेड चे हॉस्पिटल

पुणे दि. १८ जून : ‘रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या ब्रीदाला अनुसरून माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. सरस्वती कराड यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’ (एसएसकेएच)ची निर्मिती कोथरुड येथील पौड रोड, विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या जवळ करण्यात आली आहे.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज २०० बेडच्या हॉस्पिटलचे उद्घाटन सोमवार, २३ जून २०२५ रोजी, सकाळी १०.३० वाजता, केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री. नितिन गडकरीजी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती एमआयटी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे, कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास आणि हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. श्री. गिरीश महाजन व राज्यसभेच्या खासदार मा. सौ. मेधा कुलकर्णी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड हे असतील.
केअर (काळजी घेणे), क्युअर (उपचार देणे), हील (बरे करणे) ह्या तत्वांवर बांधलेले हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे बहुमजली रुग्णालय कोथरुड ह्या पुण्याच्या अत्यंत गजबजलेल्या उपनगरात मध्यवर्ती ठिकाणी लोकांच्या सेवेत रुजू होत आहे.
सदर रुग्णालयात आपत्कालीन सेवा, सीटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी, एक्स रे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी सारख्या सेवा २४ तास उपलब्ध असतील. तसेच वैद्यकीय, हदयरोग, नवजात शिशु, शस्त्रक्रिया यांकरिता अतिदक्षता विभाग उपलब्ध आहे. मेडिसिन, सर्जरी, प्रसूतीशास्त्र, अस्थिरोग, सांधेरोपण, मणक्याचे विकार, मानसोपचार, त्वचाविकार, नेत्ररोग, कान -नाक-घसा, बालरोग, कॅन्सर चिकित्सा व उपचार, मेंदूविकार व चिकित्सा आणि त्यावरील उपचार इ. विशेष तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध असतील.
या रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णालयीन सेवेत १०% सूट दिली जाणार आहे.
रुग्णांना केंद्रस्थानी ठेऊन, सर्व सेवा-सुविधांनी सुसज्ज असे हे रुग्णालय पुणेकरांच्या सेवेत रुजू होत आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत ‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’ (एसएसकेएच) चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिरीष भातलवंडे व मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अमोल सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.